नववर्षात 1 जानेवारीपासून ‘हे’ 5 नियम बदलणार, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षात पर्सनल फायनान्सशी संबंधित अनेक बदल 1 जानेवारी, 2021 पासून लागू होत आहेत. यात चार चाकी वाहनांसाठी FASTags अनिवार्य, चेकद्वारे पैसे देण्याचे नियम बदलणार, तसेच कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या मर्यादेत वाढ आदींचा समावेश आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांवर याचा परिणाम होणार आहे.

चार चाकी वाहनांसाठी FASTags अनिवार्य –
केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. यानुसार, 1 जानेवारी 2021 पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हा नियम जुन्या म्हणजेच ज्या वाहनांची विक्री 1 डिसेंबर 2017 पूर्वी झाली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांनादेखील लागू असणार आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, थर्ड पार्टी इंश्युरन्स घेतानादेखील मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ बंधनकारक असेल. केंद्रीय मोटार मोटार वाहन नियम 1989 नुसार ‘फास्ट टॅग’ ला 1 डिसेंबर 2017 नंतर खरेदी केलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केले आहे.

चेकद्वारे पैसे देण्याचे नियम बदलणार –
1 जानेवारी, 2021 पासून, चेक पेमेंटशी संबंधित नियम बदलतील. याअंतर्गत 50, 000 पेक्षा जास्त रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह वेतन प्रणाली (पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टम) लागू होईल. पॉझिटिव्ह वेतन प्रणाली हे एक स्वयंचलित साधन आहे, जे तपासणी करून फसवणूक थांबवेल. याअंतर्गत, जो व्यक्ती धनादेश जारी करेल, त्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि देय रक्कम याबद्दल माहिती द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती एसएमएस, मोबाईल ॲप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती प्रदान करू शकते. यानंतर, चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची तपासणी केली जाईल. त्यात काही दोष असल्यास चेक पेमेंट दिले जाणार नाही.

कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहार –
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड देण्याची मर्यादा 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये केली आहे. ती 1 जानेवारी 2021पासून प्रभावी होईल. डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 5000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन प्रविष्ट केला जाणार नाही.

कारच्या किमतीत होणार वाढ –
जानेवारी 2021 पासून वाहन कंपन्या त्यांच्या बर्‍याच मॉडेल्सच्या किंमती वाढवणार आहेत, त्यानंतर कार खरेदी पूर्वीपेक्षा जास्त महाग होईल. महिंद्रा नंतर आतापर्यंत मारुती, रेनो आणि एमजी मोटरने किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे.

GST रिटर्नचे नियम देखील बदलणार –
छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विक्री परताव्याच्या बाबतीत सरकार आणखी काही पावले उचलण्याची तयारी करीत आहे. त्याअंतर्गत जीएसटी प्रक्रिया आणखी सुलभ केली जाईल. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या प्रक्रियेत 5 कोटी रुपयांपर्यंतचा व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना पुढील वर्षी जानेवारीपासून वर्षाच्या काळात केवळ 4 विक्री परतावा भरावा लागणार आहे. यावेळी व्यापाऱ्यांना मासिक तत्वावर 12 रिटर्न (जीएसटीआर 3 बी) भरावे लागतील. याशिवाय 4 जीएसटीआर 1 भरावा लागेल. नवीन नियम लागू झाल्यानंतर करदात्यांना फक्त 8 रिटर्न भरावे लागतील. यांपैकी 4 जीएसटीआर 3 बी आणि 4 जीएसटीआर 1 रिटर्न भरावे लागणार आहेत.