परमार्थात ‘या’ 5 गोष्टी फार महत्वाच्या असतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. परमार्थात भाव, श्रद्धा, विश्वास, निष्ठा, अनन्यता असेल तरच त्याचे फळ मिळते. भगवान अर्जुनाला म्हणतात;

ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते!
श्रध्दधाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रियाः !!

जे भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवून मत्परायण राहतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. साधकाच्या अंतःकरणात परम श्रद्धा असेल तरच निराकाराचे दर्शन होईल. श्रद्धेतच ईश्वराचे अस्तित्व दडलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात;

तरी श्रद्धा करूनि आदरें ! जयाच्या ठायी विस्तारें ! जीविं जेयां थारें ! अनुष्ठिती !!

भक्ती साधनेत मुख्यतः श्रद्धाच लागते.कारण भक्तीचे फल अदृष्ट आहे. दृष्ट फलाकरिता श्रद्धेची आवश्यकता नाही. भगवान म्हणतात; श्रद्धावान लभते ज्ञानम् !आपण म्हणाल; श्रद्धा म्हणजे तरी काय. .? शास्त्रकार श्रद्धेची व्याख्या करतात;

तत्र श्रुतिवाक्ये गुरूक्तौच सत्य बुद्धिः श्रद्धा. ..!

श्रुतिवाक्याच्या ठिकाणी व सद्गुरु वचनाच्या ठिकाणी जी सत्यत्व बुद्धी तिला श्रद्धा असे म्हणतात.
सत्य मानण्याचे नाव श्रद्धा.शास्त्रकार म्हणतात;

तादृश्यव्यभिचारिणी श्रद्धा यस्यास्ति श्रद्धावान. ..!

देव आहे तो सर्वत्र व सर्वान्तरयामि आहे अशी अव्यभिचारिणी श्रद्धा ज्याच्याकडे आहे तो श्रद्धावान. संतांची शास्र प्रमाणावर किती अढळ श्रद्धा होती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात;

पै अहिता पासोनि काढिती ! हित देऊनि वाढविती ! नाही गा श्रुति परौती ! माऊली जगा!!

अहिता पासून निवृत्त करून हिताचाच उपदेश करणारी श्रुती सारखी माता या जगात नाही. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील वैदिक शास्त्रावर किती नितांत श्रद्धा होती. महाराज एका अभंगात म्हणतात;

वेदश्रुति नाही ग्रंथ ज्या प्रमाण
संतांचे वचन न मानी जो
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा
ओळखा जातीचा अधम तो..!

या प्रमाणांचा विचार एवढ्या साठी सांगितला की; वेद वचन आणि गुरू वचनावरील विश्वासालाच श्रद्धा असे म्हणतात. बाकी उर्वरित चिंतन पुढील लेखात करूयात.

हभप भरतबुवा रामदासी, बीड

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/