देशात लवकरच सुरु होणार 8 नव्या बँका, RBI कडून नावांची यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत बँकेची सेवा पोहोचावी यासाठी मागिल वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला आहे. तसेच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, खासगी कंपन्या यांना दखील या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांना बँकिंग यंत्रणा उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण आरबीआयने स्विकारले आहे. यामुळे अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकिंग क्षेत्रात अनेक खासगी कंपन्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये उज्जीवन, जनलक्ष्मी, सूर्योदय, कॅपिटल, उत्कर्ष, इक्विटास अशा अनेक कंपन्या आहेत.

सूक्ष्म, लघू उद्योगांना कर्ज पुरवठा व्हावा, अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना बँकिंग सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी लहान स्वरुपातील बँकांचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे. युनिव्हर्सल बँक या प्रकाराअंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या मोठ्या आकाराच्या बँकांचा समावेश होतो. सध्या युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँक अशा दोन्ही प्रकारातील बँका सुरु करण्यासाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेनं बँकिंग परवान्यासाठी कधीही अर्ज करण्याची ऑन टॉप नवाची सुविधा सुरु केली असून यासाठी मार्गदर्शक सूचना 1 ऑगस्ट 2016 आणि 5 डिसेंबर 2019 रोजी जारी करण्यात आल्या होत्या. आरबीआयकडे पात्रता पूर्ण करणारी 8 निवेदने आली आहेत. त्यानुसार सर्वप्रकारच्या सेवा देणाऱ्या युनिव्हर्सल बँक अर्थात सार्वत्रिक सेवा देणाऱ्या बँक स्थापन करणारे चार आणि लघु अर्थपुरवठा करणाऱ्या म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेसाठी चार निवेदनांचा समावेश आहे.

युनिव्हर्सल बँक

यूएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड, द रिपॅट्रिएट्स को ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेवलपमेंट बँक लिं., चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लि. आणि पंकज वैश्य यांनी युनिव्हर्सल बँक लायसन्ससाठी अर्ज केले आहेत. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी सप्टेंबर 2019 मध्ये चैतन्य प्रा. लि. मध्ये 739 कोटी रुपये गंतवून अनेक शेअर्स खरेदी केले होते.

स्मॉल फायनान्स बँक

स्मॉल फायनान्स बँकेसाठी व्हिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कॅलिकट सिटी सर्व्हिस को. ऑप. बँक लि., अखिल कुमार गुप्ता आणि क्षेत्रीय ग्रामीण फायनान्सिअल सर्व्हिसेस, प्रा. लि. इत्यादी कंपन्यांनी अर्ज केला आहे.

बँकांसाठी निकष

आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, युनिव्हर्सल बँकेचा परवाना मिळवण्यासाठी कंपनीचे नेटवर्थ 500 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. तर स्मॉल फायनान्स बँकेसाठी नेटवर्थ 200 कोटी रुपये असणे आवश्यक आहे. एखादी शहरी सहकारी बँक स्वेच्छेने स्मॉल फायनान्स बँकेत परिवर्तीत होऊ इच्छित असेल तर सुरुवातीला तिचे नेटवर्थ 100 कोटी रुपये असल्यास तिला परवानगी मिळू शकते. मात्र पुढील पाच वर्षात ते 200 कोटी करणे आवश्यक आहे.