जाणून घ्या : पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर असणार ‘ही’ 8 स्थानके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे- नाशिक या नियोजित रेल्वे मार्गाला राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असून ही मंजूरी कधी मिळते याकडे महारेलचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर 8 प्रमुख स्थानकांची शिफारस करण्यात आली असून त्याला राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी 1200 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

पुणे-नाशिक या रेल्वे मार्गाला मध्य रेल्वे आणि रेल्वे खात्याने परवानगी दिली आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून याला परवानगी मिळालेली नाही. राज्य सरकारच्या परवानगीकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंड कॉर्पोरेशन लिमिटेडने (MRIDC) या बाबतचा प्रकल्प अहवाल राज्य सरकारकडे सहा महिन्यांपूर्वी सादर केला आहे, अशी माहिती महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या रेल्वे मार्गावर पिंपरी चिंचवड, चाकण, खेड, रांजणगाव, सिन्नर, नाशिक येथील औद्योगिक वसाहती आहेत. त्यांनाही या मार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीही स्वतंत्र रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच मार्गावर स्थानकांसाठी 24 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यातून किमान 8 प्रमुख स्थानके असतील. यातून राज्य सरकारने स्थानके निश्चित करायची आहेत. त्यानुसार त्यांची रचना करण्यात येणार आहे. तर लहान स्थानकांसाठी स्वतंत्र लोहमार्ग असेल. त्यावर लोकलसारखी वाहतूक व्यवस्था सुरु करण्याचेही महारेलचे नियोजन आहे.

पुणे- नाशिक मार्गावर यातून होणार 8 स्थानके
– पुणे, हडपसर, मांजरी, कोलावाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूट, साकूर, आंभोरे, संगमनेर, देवथान, चास, दोडली, सिन्नर, मुढारी, शिंदे, नाशिक – पुणे, हडपसर, खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक या परिसरात स्थानके होऊ शकतात. मात्र, राज्य सरकारने त्याला मंजूरी दिल्यावर या बाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल असे महारेलकडून सांगण्यात आले आहे.