कामाची गोष्ट ! ‘या’ 4 अ‍ॅप्सची मदत घेतल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ एकदम सोप्पे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात १२६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. त्यामुळे राज्य सरकार कडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिम ,शाळा ,महाविद्यालये , जलतरण तलाव ,महत्वाची मंदिरे, बंद करण्यात आली आहेत. तसेच बऱ्याच खाजगी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देत आहेत.

मात्र, त्यामुळे कंपन्यांसह कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आदेशामुळे भाडेतत्वावर मिळणाऱ्या लॅपटॉप, डेस्कटॉपच्या भाड्यामध्ये वाढ झाल्याने कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आली आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचत असला, तरी घरुन काम करताना काही तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेषत: टीमला एकत्र काम करायचं तर काय असा प्रश्न येतो. घरुन काम करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशा काही अ‍ॅप्सविषयी…

वर्कप्लेस बाय फेसबुक

फेसबुकचं ‘वर्कप्लेस बाय फेसबुक’ हे अ‍ॅपसुद्धा आहे. याविषयी फारच थोड्या जणांना माहिती आहे. हे अ‍ॅप कॉर्पोरेट विश्वासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हे अ‍ॅप फायदेशीर आहे. तुम्हीही वर्क फ्रॉम होम करत असाल, तर या अ‍ॅपचा नक्की विचार करा. हे अ‍ॅप आयओएस, अँड्रॉइड आणि डेस्कटॉपसाठी उपलब्ध आहे.

बीटरीक्स २४

टीमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या दिवसांची अपडेट्स ठेवणारं, ग्रुप चॅट करण्याची सोय आणि टीम म्हणून काम करताना निर्णय घेण्यास उपयुक्त ठरणारं टूल म्हणून बीटरीक्स २४कडे बघितलं जातं. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना टीममधील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणांहून कार्यरत असतात. अशा वेळी संवादांमध्ये अडथळा येऊन गैरसोय होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी बीटरीक्स २४ फायदेशीर ठरतं. हे अ‍ॅप टीममधील सदस्यांमध्ये संपर्क सुरळीत ठेवण्यावर भर देतं. हे अ‍ॅप आयओएस, अँड्रॉइड आणि डेस्कटॉपसाठी उपलब्ध आहे.

स्लॅक

विंडोज, मॅक, आयओएस, अँड्रॉइट आणि वेब अशा सगळ्या माध्यमांसाठी उपलब्ध असलेलं अ‍ॅप म्हणजे स्लॅक. कॉर्पोरेट मेसेजिंगसाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतं. म्हणजेच टीममधल्या सदस्यांमधील संवाद सुरळीत ठेवण्यासाठी हे अ‍ॅप प्रभावी ठरते, त्यामुळे कधीही वर्क फ्रॉम होम करायचे असल्यास हे अप फार उपयोगी पडते. यावरुन फाइल शेअर करणंही सोयीचं आहे. तसंच व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्ससाठी हे अ‍ॅप उपयुक्त ठरतं. याद्वारे तुम्ही स्क्रीन शेअरिंगही करु शकता.

झूम

वर्क फ्रॉम होम करताना बऱ्याचदा व्हिडीओ कॉल किंवा कॉन कॉल करावे लागतात. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अनेक अ‍ॅप्सच्या माध्यमातून व्हिडीओ कॉल करणं सोयीचं असलं, तरीही त्यात अनेक त्रुटी आहेत. नेटवर्कमुळे त्यात अनेकदा अडथळे येत असतात. अशा वेळी झूम या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो. हे विंडोज, मॅक, आयओएस, अँड्रॉइड आणि वेब अशा सगळ्या माध्यमांसाठी उपलब्ध आहे. याद्वारे वेबिनार्स, मेसेजिंग, व्हॉइस मीटिंग्स, व्हॉइस कॉल्स आणि फाइल शेअरिंग करणं सुलभ होतं. कॉर्पोरेट जगतासाठी हे अ‍ॅप उत्तम असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

You might also like