Pandharpur Election Results 2021 : विजयी परंपरा कायम राखण्यात अपयशी, ‘ही’ आहेत भगिरथ भालकेंच्या पराभवाची कारणे

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3503 मतांनी बाजी मारली. दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा अवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान अवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांनी या मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. मात्र वडिलांच्या विजयाची परंपरा राखण्यात भगीरथ भालके यांना अपयश आल्याचे सांगितले जात आहे. भगिरथ यांच्या पराभवाने भारत भालके यांच्या विजयाची परंपरा खंडीत झाली आहे.

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची यावरुन राष्ट्रवादीत संभ्रम होता. माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, भालके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार असावा म्हणून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली.

भगिरथ भालके हे दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. वडील आमदार असतानाच भगीरथ यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात फारसे दिसले नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भगिरथ यांचा पराभव झाला असताना देखील राष्ट्रवादीने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. गेल्या वर्षी कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ आली होती.

भगिरथ भालके यांनी चार वर्षापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या आधी किंवा त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क आला नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क ठेवून लोकांची कामे केली नाहीत. तर समाधान अवताडे हे गेल्या अनेक वर्षापासून थेट जनतेच्या संपर्कात होते. समाधान अवताडे हे मागिल निवडणूकीत अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना चांगले मतदान झाले होते. अवताडे गटाच्या ताब्यात दामाजी शुगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सहकारी संस्था आणि अनेक ग्रामपंचायती आहेत.

निवडणूक मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा अपयशी ठरली. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादीची यंत्रणा अत्यंत तोडकी होती. या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियापासून कॉर्नर बैठकांपर्यंतच्या सर्व तंत्राचा वापर केला. त्या तुलनेत भालके यांची यंत्रणा कुठेच दिसली नाही. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मतदारसंघात घोंगडी बैठका घेऊन प्रचार केला. त्यामुळे खुप मोठा फरक पडला.

भाजपच्या विजयात पहिली चूक राष्ट्रवादी उमेदवार निवडीत झाली. या निवडणुकीत भारत भालके यांच्या विधवा पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिली असती तर सहानुभूती मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीला मिळाली असती. सलग दोन निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे परिचारक गटाने पक्षाचा निर्णय मान्य करत समाधान अवताडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत प्रामाणिक काम केल्याने परिचारक गटाची मते अवताडे यांना मिळाली. त्यामुळे अवताडेंचा विजय सोपा झाला. तसेच सरकारच्या उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि सरकारविरोधी वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी ठरले, अशी काही कारणे राजकीय वर्तुळातील तज्ज्ञ व विश्लेषक देत आहेत.