1 मेपासून गॅस सिलेंडरपासून ते बँकिंगपर्यंतचे ‘हे’ 5 नियम बदलणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशातील काही नियमांमध्ये बदल करण्यात आले असून, आता याची अंमलबजावणी येत्या 1 मेपासून केली जाणार आहे. यामध्ये गॅस सिलेंडरपासून ते बँकिंग व्यवहारांचा समावेश आहे. त्यामुळे याचा नेमका काय परिणाम होणार हे जाणून घेणे गरजेचे आहे.

जाणून काय आहेत नियम अन् काय होणार परिणाम…

गॅस सिलेंडरचे दर बदलणार

देशातील सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात बदल करतात. 1 मेलाही गॅस सिलेंडरच्या नव्या किमती जाहीर होणार आहेत. या किमतींमध्ये वाढ होऊ शकते किंवा पुन्हा कपात होऊ शकतो. याबाबतची घोषणा 1 मे रोजी केली जाणार आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या नियमांत होणार हे बदल…

अ‍ॅक्सिस बँकेने 1 मेपासून बचत खात्यामधील किमान ठेवीबाबतचा नियम बदलला आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या ईझी सेव्हिंग स्कीम खात्यांमध्ये किमान ठेवीची मर्यादा 10 हजारांवरून 15 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 1 मेपासून फ्री लिमिटनंतर एटीएममधून कॅश काढल्यास सध्याच्या तुलनेने दुप्पट दंड आकारला जाणार आहे. याशिवाय बँकेने अन्य सेवांसाठीचे शुल्कही आधीच्या तुलनेत वाढवले आहे.

18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केली आहे. या लसीकरणासाठी सरकारने अनेक नियम बदलले आहेत. अनेक नवे नियमही लागू केले आहेत. त्यामुळे सरकारने ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रियाही अनिवार्य केली आहे.

IRDA कडून पॉलिसी कव्हर रक्कम दुप्पट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान विमा नियामक कंपनी असलेल्या IRDA ने आरोग्य संजीवनी पॉलिसीची कव्हर रक्कम दुप्पट करण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांना 1 मेपर्यंत 10 लाख रुपयांपर्यंत कव्हर देणारी पॉलिसी सादर करावी लागेल. यापूर्वी गतवर्षी 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य संजीवनी पॉलिसीची किंमत जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतच होती.

मे महिन्यात 12 दिवस बँका बंद

मे महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, संपूर्ण देशातील बँका बंद राहणार नाहीत तर काही राज्यांमध्येच त्या बंद राहतील. RBI च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुट्यांमधील काही सुट्या या स्थानिक पातळीवरील आहेत.