शरीर थंड ठेवणारे ‘हे’ पदार्थ उन्हाळ्यात लाभदायक

पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात थंड पेय अथवा आईस्क्रीम खाण्याकडे सर्वांचाच कल असतो. परंतु, यामुळे शरीरात थंडावा निर्मण होत नाही. उलट अशा थंड पदार्थांमुळे त्रासदेखील होऊ शकतो. त्याऐवजी आपल्या आयुर्वेदात सांगितलेले व थंड गुणधर्म असणारे पदार्थ सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळू शकतो. या थंड गुणधर्माच्या पदार्थांमुळे उन्हाळ्यात होणारे आजार आपण टाळू शकतो. गुलकंद, जिरे, सब्जा, तुळशीचे बी, ताक, कोथिंबीर या पदार्थांचे सेवन केल्यास उन्हाळ्यात खूपच फायदा होतो.

गुलकंद हे चवीला गोड, स्वादिष्ट असते. गुलकंद दिवसातून एकदा तरी खावे. थंड दुधात किंवा थेट गुलकंदाचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन पचनाचे विकार कमी होतात. तसेच जिऱ्याचे पाणीदेखील उन्हाळ्यात शरीरासाठी उपयोगी आहे. एका ग्लासात चमचाभर जिरे रात्रभर भिजत घालून ते पाणी अनशापोटी प्यावे. हे पाणी प्यायल्यावर जिरे चावून खाल्ल्यास अधिक आराम पडतो. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. सब्जा आणि तुळशीचे बी यापैकी एक रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन करावे. हा सर्वात खात्रीशीर उपाय असून उन्हाळा लागलेल्या व्यक्तीने तर दर तासाला असे पाणी प्यावे.

ताक हे पृथ्वीवरचे अमृत मानले जाते. विशेषतः जेवताना ताक आवश्य घ्यावे. त्यात हिंग आणि काळे मीठ घालावे. असे ताक दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच कोथिंबीर सुद्धा थंड गुणधर्माची असते. कोथिंबीर वाटून केलेला रस हा उष्णतेचे विकार आणि पित्तावर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात कोथिंबिरीचा वापर वाढवावा. अगदी रस नाही केला तर जेवताना कोथिंबीर धुवून, चिरून टाकल्यास त्याचा फायदा होतो.