दिल्लीतील शेतकरी आंदोलन : ‘हे हिंदू गद्दार आहेत’, युवराजच्या वडिलांचे वादग्रस्त विधान, अटकेची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादग्रस्त विधानांमुळे नेहमी वादात सापडणारे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाऊन त्या ठिकाणी हिंदूवर वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराजदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी गेले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योगराज हे या व्हिडिओत पंजाबीमधून भाषण करत असून, ते हिंदूंना ‘गद्दार’ म्हणताना दिसत आहेत. ‘हे हिंदू गद्दार आहेत, त्यांनी शंभर वर्षे मोगलांची गुलामी केल्याचे म्हटले आहे. यानंतर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे ट्विटरवर ‘Arrest Yograj Singh’ ट्रेंड होत आहे. अनेकांनी योगराज यांचे भाषण निंदनीय, भावना भडकाविणारे, अपमानजनक असल्याची टीका केली आहे. युवराजला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने त्यांनी अनेकदा तत्कालीन कप्तान धोनीवरही वादग्रस्त टीका केली होती.

कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी एकवटले आहेत. आता हे शेतकरी दिल्लीमध्ये संसदेला घेरण्य़ाच्या प्रयत्नात असून, 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करत या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा, अश्रूधूर, बॅरिकेड्स लावत रोखून धरले आहे.

आज चर्चेची पाचवी फेरी
आज केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. यातच शेतकऱ्यांनी आज ही आरपारची लढाई असेल, असा इशारा सरकारला देत केवळ कृषी कायदे रद्द करण्यावरच चर्चा होईल, असे सांगितले आहे. तसेच पुढील आठवड्यात आंदोलन आणखी तीव्र करून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे.