विश्वजीत कदमांसह पश्चिम महाराष्ट्रातून ‘या’ आमदारांची मंत्री पदी वर्णी ?, खलबतं सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार स्थापन होत असताना आता मंत्रीपदांच्या नावासाठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: सत्तेच्या नाट्यमय घडामोडींनंतर या तीनही पक्षांमध्ये आपआपले गड मजबूत करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे स्पष्ट दिसत असून एकेकाळी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार यावर खलबत सुरू झाली आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये पुणे आणि सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गढ मानला जातो. भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि अवघ्या ७८ तासांमध्ये राजीनामा देणारे पश्‍चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील या प्रमुख नेत्यांचा मंत्री मंडळातील समावेश निश्‍चित मानला जात आहे. तसेच दुसर्‍या फळीतील नेत्यांचीही राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. पुण्यासह सातार्‍यातील कराड, सांगली, कोल्हापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामधून काँग्रेसलाही यंदा बर्‍यापैकी यश मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतच सांगलीतून डॉ. विश्‍वजीत कदम यांची नावे अग्रक्रमाने घेतली जात आहेत. त्याचवेळी सलग तिसर्‍यांदा आमदार झालेले भोर- मुळशी मतदारसंघातील आमदार संग्राम थोपटे यांचे नावही अग्रक्रमाने घेतले जात आहे. मुख्यमंत्री पद भुषविलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्री मंडळात पंतप्रधान कार्यालयाचा कारभार पाहीला आहे. तर माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव डॉ. विश्‍वजीत कदम यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भुषविले आहे. २०१४ मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविलेल्या डॉ. कदम यांनी पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगलीतील पलूस- कडेगाव मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली व विजयीही झाले. तर नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पावती म्हणून याच मतदारसंघातून ते राज्यात सर्वाधीक मताधिक्याने निवडूण आले आहेत. तरुण आणि आश्‍वासक चेहरा म्हणून डॉ. विश्‍वजीत कदम यांचाही मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उध्दव ठाकरे हे उद्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसआणि काँग्रेसमध्ये मंत्री मंडळातील पद वाटपावरून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या शपथविधी पुर्वी जी नावे निश्‍चित केली जातील, त्यांचाही शपथविधी उद्याच होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये रात्री उशिरापर्यंत यासाठी तीनही पक्षांच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू होते.

शंभुराजे देसाई यांची मंत्रीपदी वर्णी ?
शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात दणका बसला आहे. पुणे आणि नगर या लगतच्या दोन्ही जिल्ह्यातून एकही आमदार निवडून आलेला नाही. अशातच कोल्हापूरमधून मागील निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचाही पराभव झाला आहे. राधानगरी, पाटण आणि सातार्‍यातील कोरेगाव मतदारसंघ असे तीनच आमदार विजयी झाले आहेत. यापैकी पाटण मधून सातत्याने भगवा फडकवणारे शंभुराजे देसाई यांची मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like