पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी ‘या’ 3 अधिकार्‍यांची नावे चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नवल किशोर राम यांची बदली पंतप्रधान कार्यालयात झाल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पदासाठी तीन अधिकाऱ्यांची नावं सध्या स्पर्धेत आहेत, याबाबतचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

पुण्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. पुणे जिल्ह्याची स्थिती चिंताजनक असतानाच नवल किशोर राम यांची बदली झाली. ते रविवारी (दि.9) पंतप्रधान कार्यालयातील पदाचा पदभार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. रिक्त झालेल्या पदाचा पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हाधिकारी पद रिक्त झाल्यानंतर या जागेवर नव्या अधिकाऱ्याची नेमणूक लवकरच केली जाईल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत असलेल्या नावांविषयीची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदासाठी तीन नावं स्पर्धेत असून पहिलं नाव सध्याचे हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे. तर दुसरं नाव लातूरचे जिल्हाधीकारी जी. श्रीकांत यांचे आहे. तर तिसरे नाव योगेश म्हसे यांचे आहे. म्हसे हे सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. योगेश म्हसेकर यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलं आहे.
ही तीन नावं पुणे जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत आहेत. या तिन्ही अधिकाऱ्यांना चांगला अनुभव आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या शिवाय आस्तिक कुमार पांडे यांचे देखील नाव पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत आहे.