थेऊर : प्रदीर्घ विश्रांती नंतर आज पाऊस बरसला

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर आज थेऊर येथे जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे बळीराजा सुखावला असून अनेक पिकांना जीवदान मिळाले आहे.
जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व हवेलीतील पाऊस पडल्यानंतर त्याने दडी मारली होती अनेक शेतकरी या दरम्यान ऊस पिकांची लागवड करतात तसेच अनेकांची भाजीपाला पीके आहेत.

यावर्षी पावसाने चांगल्या सुरुवातीनंतर मात्र लहरीपणा दाखविला.पुणे जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे धरणातील पाणी पातळीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात पाण्याची समस्या जाणवू शकते.

पूर्व हवेलीतील गावामध्ये विहिरीतील पाणी साठ्यात विशेष काही भर पडलेली नाही शेतकरी मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. जवळपास दोन महिन्याचा पाऊसकाळ संपत आलेला आहे नैॠत्य मोसमी पावसावरच पुणे शहर व जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली जातात. मराठवाड्यात पावसाने चांगली मेहेरबानी केली असल्याने शेती पिकांची परिस्थिती चांगली आहे.