थेऊरक्षेत्री भाविकांची वाढली रेलचेल

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे सध्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून येथील अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे त्यामुळे बाजारपेठेत गजबज वाढलेली दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात आल्याने राज्य शासनाने दिवाळीच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे खुली केली परंतु सुरुवातीला भाविकांची संख्या अतिशय मर्यादित होती.सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असल्या तरीही आणखी शाळेचा निर्णय अधांतरी आहे केवळ नववी ते बारावी वर्गांना परवानगी मिळाली आहे त्यामुळे मुलांना बाहेरगावी फिरायला घेऊन जाताना बहुतेक जण देवदर्शन घेण्यास जास्त पसंती देत आहेत.

थेऊर अष्टविनायकापैकी पाचवा गणपती श्री चिंतामणी म्हणून भाविकांत परिचित आहे.येथील भक्तनिवास निवासामध्ये अलिकडे भाविक मुक्कामी नव्हते परंतु गेल्या काही दिवसात येथे भाविकांची रेलचेल वाढली आहे.

येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची तपासणी करून प्रवेश दिला जात असला तरीही अनेक भाविक सुचनाकडे दुर्लक्ष करताना दिसतात.थेऊरचे ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर यांनी सांगितले की भाविकांची संख्या वाढत असून गावच्या वतीने प्रशस्त वाहनतळाची व्यवस्था व स्वच्छता कायम ठेवण्याची व्यवस्था केली आहे