थेऊर : आठवडे बाजार चालू झाल्याने शेतकरी आनंदी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन –  अ‍नलाॅकच्या पुढच्या टप्प्यात आठवडे बाजार चालू करण्यास परवानगी मिळाली त्यामुळे स्थानिक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे कारण महाराष्ट्र शासनाने अ‍नलाॅकचा निर्णय घेतल्यावरही आठवडे बाजारला यातून वगळले होते.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यात आली यात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आठवडे बाजारही बंद करण्यात आला त्याचा प्रत्यक्ष परिणाम शेतकर्यांच्या अर्थकारणावर झाला.गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना भाजीपाला चढ्या भावाने विकत घ्यावा लागला यावर अनेक वेळा प्रसिध्दी पण झाली पण शेतकर्याच्या पदरात मात्र यातील निम्मा फायदाही मिळाला नाही अनेक अडचणींना तोंड देत पोटच्या मुलाप्रमाणे जपलेले पीक त्याचा मोबदला मात्र तिसराच उकळत होता.

आठवडे बाजारात हे शेतकरी स्वतः भाजी विक्री करतात त्यामुळे त्यांना याचा फायदा होतो.आज शासनाच्या निर्णयाने पूर्व हवेलीतील प्रतिबंधीत क्षेत्रा व्यतिरिक्त इतर गावात आठवडे बाजार चालू होतील. सध्या कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असून बहुतेक गावात ती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण तालुक्यात ही संख्या दोन अंकात आहे.

या निर्णयावर प्रगतीशिल शेतकरी विजय कुंजीर म्हणाले की शासनाने आज घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे आम्ही आणखी एका निर्णयाच्या प्रतिक्षेत आहोत तो म्हणजे फुल उत्पादक शेतकरी हा मंदीरावर अवलंबून आहे म्हणून यावर शासनाने लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा.