थेऊरमध्ये विषमज्वर रुग्णाची लागण, आरोग्य विभाग लागला कामाला

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – विषमज्वर (टायफाॅईड) या आजाराने थेऊर येथे अनेक रुग्ण त्रस्त असल्याची चर्चा होत असून यावर आरोग्य विभागाकडून तत्परतेने शहानिशा करण्यासाठी संबंधित आरोग्य सेवकाला सूचना दिल्या गेल्या आहेत. हा आजार दुषित पाण्यातून पसरत असल्याने पाण्याचे नमुने तपासण्यासाठी देण्यात आले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. मेहबूब लुकडे यांनी विषमज्वर हा आजार दुषित पाण्यातून पसरत असल्याचे सांगितले. तसेच रुग्णामध्ये ताप येणे, मळमळ होणे, उलट्या, डोके दुखी, पोट दुखी, भूक न लागणे, चिडचिड होणे, अंगावर लालसर डाग दिसले तर हा आजार झाला असे समजले जाते. यावर रुग्णांनी घाबरुन न जाता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रितसर तपासणी करून घ्यावी. हा आजार झाल्यावर संपूर्ण आराम घ्यावा तसेच पाणी उकळून पिणे त्याचप्रमाणे पालेभाज्या स्वच्छ धुऊन शिजवून घ्याव्यात आपला परिसर स्वच्छ ठेवावा भरपूर पाणी पिणे व रसदार फळांचे सेवन केले पाहिजे असे सांगितले.

थेऊर हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र आहे. येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून फिल्टर पाण्याची अल्प दरात सोय केली आहे. तरीही विषमज्वर या आजाराने कसे तोंड वर काढले हे कळणे अवघड झाले आहे. येथील अनेक नागरिक या आजाराने त्रस्त असल्याची तक्रार एका स्थानिकाने केली आहे. येथील बहुसंख्य नागरिक सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने दवाखान्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. खाजगी डाॅक्टर महागडी तपासणी करण्यासाठी सांगतात त्यामुळे हा खर्च वाढत आहे.

ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये तर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा तसेच थेऊर येथील आरोग्य सेविका भारती सोनवणे अथवा आरोग्य सेवक बिराजदार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन कुंजीरवाडी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. मेहबूब लुकडे यांनी केले. या आजारावरील सर्व चाचण्या आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.