थेऊर : विश्वासात घेऊन फसवणूक करणारा भामटा लोणीकंद पोलिसांच्या जाळ्यात

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या ओळखीतील माणसांना विश्वासात घेऊन त्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्यास लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद तुकाराम बांदल (वय 30, रा. वाघोली, पुणे) यांना मे 2019 पासून ते दिनांक 30/10/2020 रोजी पर्यंत मौजे वाघोली गावचे हद्दीत कृष्णकुंज, वाघोली येथे नरेंद्र बोदडे (रा. ड्रीम संकल्प, वाघोली, पुणे) याने त्यांचा विश्वास संपादन करून दागिने घेऊन ते एक महिन्यात सोडवून देतो, असे सांगून दागिने घेतले. परंतु त्याने ते परत न देता मनिपुरम फायनान्समध्ये ठेऊन त्या बदल्यात घेतलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केली होती.

मे 2019 मध्ये नरेंद्र बोदडे हा शरद बांदल यांच्या घरी आला व रांजणगाव MIDC मधील कल्याणी टेक्नो फोर्ज या कंपनीमध्ये स्क्रॅप ( स्टनिंग बर्क ) मटेरियलची निविदा निघाली असून, त्यासाठी 10 लाख रुपयांची आवश्यकता असून, 5 लाख रुपये आपल्याकडे आहेत परंतु अजून 5 लाख रुपये आवश्यक आहेत. पैसे नसतील तर सोने मला दे ते मी एका महिन्यामध्ये परत करतो, असे सांगून दागिने घेऊन गेला; परंतु परत देण्यास टाळाटाळ केली. म्हणून कंटाळून बांदल यांनी गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याची लोणीकंद गुन्हे शोध पथक उकल करीत असताना दिनांक 04/03/2021 पथकातील समीर पिलाने यांना यातील इसम नरेंद्र बोदडे हा वाघोली येथील वाघेश्र्वर मंदिराजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तसेच त्यांच्या तांत्रिक कौशल्याने त्याला वाघोली येथे सापळा रचून ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारताच त्याने त्याचे नाव नरेंद्र गोपाळ बोदडे रा. ड्रीम संकल्प सोसा. वाघोली, पुणे असे सांगितले. त्यास तपास कामी ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक बाळकृष्ण वाडेकर करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद गुन्हे शोध पथक – पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समीर पिलाने, सागर कडू, ऋषिकेश व्यवहारे व शिरीष कामठे यांनी केली आहे. लोणीकंद पोलिसांनी आवाहन केले, नरेंद्र बोदडे याने आजपर्यंत अनेक प्रतिष्ठित नागरिकांना अशाच प्रकारे गंडा घातला असल्याची दाट शक्यता आहे. तरी अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर लोणीकंद पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.