थेऊर : होळकरवाडीत हुक्का पार्लरवर धाड टाकून 37 हजारांचा मुद्देमाल जप्त; 5 जण ताब्यात

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत होळकरवाडी गावात अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का पार्लरवर शनिवारी रात्री धाड टाकून ३७,००० हजार रुपयांचा मुद्देमाल व पाच जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की, होळकरवाडी गावच्या हद्दीत हाॅटेल जे २ के येथे अवैधरित्या हुक्का विक्री केली जात आहे. त्यावर महानोर यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस शिपाई बाराते, रोहिदास पारखे यांना याची कल्पना दिली. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या सूचनेप्रमाणे पंच घेऊन होळकरवाडी येथे हे पथक पोहोचले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे पथक हाॅटेलवर पोहोचले, तेव्हा तेथील गिऱ्हाईक मागच्या दरवाजाने अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले; तर तेथे पाच जण आढळून आले. त्यात हाॅटेल मालक अक्षय दिलीप जगताप (रा. हांडेवाडी), मॅनेजर कुमार विलास गोफणे (रा. होळकरवाडी), वेटर सचिन मधुकर मोटे, आकाश राजू काहार, गजेंद्र अशोक काटकर यांना ताब्यात घेतले. तेथे वेगवेगळ्या रंगाचे १९ पाॅट १३,३०० रुपये, १३ हुक्का फ्लेवर १९,५०० रुपये, रबरी पाईपच्या ३८०० चिलीम ४,१६० रुपये असा एकूण ३६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.