थेऊर : गव्हाची विक्रमी लागवड; कोरोनाच्या अनिश्चिततेची भीती

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे अनिश्चित बाजारभाव असल्याने हवेली तालुक्याच्या पूर्व भागासह दौंड व पुरंदर तालुक्यांतील शेतकरी बांधवांनी यावर्षी गव्हाच्या पिकाचे उत्पादन घेण्याकडे जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. या खालोखाल कांदा या पिकाची लागवड होत असल्याचे चित्र आहे.

यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाल्याने कायम दुष्काळ असलेल्या दौंड व पुरंदर तालुक्यांत पाण्याची उपलब्धता मुबलक झाली आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने कंबरडे मोडले होते. यावर्षी यातून चांगले उत्पन्न घेऊन झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी तयारी करत असताना मार्च महिन्यात कोरोना संक्रमणामुळे शासनाने देशात लाॅकडाउन घोषित केले, त्यामुळे तरकारी पिकावर आपल्याला चांगला फायदा होईल, या आशेवर पाणी फेरले गेले. यामध्ये शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले. यावेळी चांगला पाऊस पडल्यावर कमी पाण्यावर भरपूर फायदा देणायाऱ्या पिकाकडे शेतकऱ्याचा कल वाढला.

उरुळी कांचन येथील गुरुदत्त शेती भांडारचे संचालक योगेश काकडे यांनी सांगितले की, यावेळी शेतकरी वर्गात कोरोनाची भीती अधिक आहे आणि पुन्हा लाॅकडाउन झाल्यावर तरकारी पिकाचे मोठे नुकसान होईल. यामुळे पीक हमी असलेली गहू व कांदा याकडे शेतकरी वळला आहे. आमच्या दुकानातून आजपर्यंत तब्बल चाळीस टन गव्हाचे बियाणे विक्री झाली असून, कांद्याचे एक टन बी विक्री झाले आहे. साधारणपणे एकरी गव्हाचे बी 40 किलो, तर कांद्याचे चार किलो लागते. गव्हाचे एकरी उत्पन्न जवळपास दोन टन मिळते. त्यामुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळलेले आहेत.

काकडे यांनी सांगितले की, यावर्षी कांदा तसेच गव्हाचे बियाणाच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत बरीच वाढ झाली आहे. कांद्याचे बी तर मिळणे अवघड झाले आहे. उरुळी कांचन ही पूर्व पटट्यातील मोठी बाजारपेठ असल्याने पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील वाघापूर, शिंगापूर, राजेवाडी, पिसर्वे, आंबळे, पारगाव मेमाणे, गुरुळी, टेकवडी, माळशिरस या भागातील शेतकरी खरेदीसाठी येथे येतात. पुरंदर उपसा सिंचन झाल्याने या भागातील मोठे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.