मोदींच्या बायोपिक बंदीबाबत विवेक ऑबेरॉयने दिली जळजळीत प्रतिक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. मोदींची भूमिका करणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉयने त्याविषयी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘अभिषेक संघवी, कपिल सिब्बल यांच्यासारखे प्रतिष्ठित वकील या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करून वेळेचा अपव्यय का करत आहेत हेच मला समजत नसून ते चित्रपटाला घाबरले की चौकीदाराच्या लाठीला हेच मला कळत नाही’, असं विवेक ओबेरॉय म्हणाला आहे .

विवेक ओबेरॉय म्हणाला की, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमापूर्वी प्रदर्शित झालेल्या इतर राजकीय सिनेमांना अनेकांनी पाठिंबा दिला. परंतु, आता माझ्या या चित्रपटाला विरोध केला जात आहे. ही तर हुकूमशाही आहे. आपण लोकशाहीत राहतो. इथे तुमच्या बापाचं नाव चालत नाही, तर तुमचं काम चालतं. ‘गांधी’ या सिनेमावरही लोकांनी टीका केली होती. या सिनेमात वास्तवाचा विपर्यास केला गेल्याचं बोललं गेलं होतं. परंतु, मी हा सिनेमा भक्तांसाठी बनविलेला नाही, तर देशभक्तांसाठी बनविलेला आहे. लोकांचं काय? ते तर चूका शोधणारच ना? असंही तो म्हणाला. ‘

म्हणून बंदी घालण्याची मागणी –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच हा चित्रपट अनेक वादांमुळे चर्चेत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता सध्या देशभर लागू आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होईल. शिवाय आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांना या चित्रपटामुळे मोठय़ा प्रमाणावर राजकीय फायदा होईल. म्हणूनच सध्या तरी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती.