गावातील अंधार दूर करण्यासाठी ‘त्यांनी’ मागितली भीक

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

गावातील अंधार दूर करण्यासाठी चक्क भीक मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड मधील शिरूर तालुक्यातील पाडळी गावात हा प्रकार घडला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाठ यांनी गावात येणाऱ्या विद्युत खांबावरील तार तुटल्याने ती बसवण्यासाठी गावभर भीक मागितली असून, यातून जमा झालेले पैसे विद्युत महामंडळाला देणार आहेत.

पाडळी हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत खांबावरील तार जुनी झाल्याने तुटते त्यामुळे गावात दिवसाआड अंधार असतो. गावापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या रायमोहा येथील ३३ के.व्ही. या विद्युत उपकेंद्रावरुन गावाला विद्युत पुरवठा केला जातो. परंतु अनेक दिवसांपासून पुरवठा करणारी तार तुटल्याने गाव अंधारात असते. गाव वर्गणीतून तार बसवली परंतु ती फार दिवस टिकली नाही , त्यामुळे आता पुन्हा तार घेण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ता माऊली शिरसाठ, भगवान पाखरे ,यांनी गावभर फिरून भीक मागितली, यातून मिळालेले पैसे ते विद्युत महामंडळ प्रशासनाकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे करंट लागून एका महिलेचा मृत्यूही झाला आहे. तसेच तुटलेल्या तारेच्या करंटमुळे अनेक मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. एवढे होऊनही विद्यूत महामंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

पोलीसनामाशी बोलताना माऊली शिरसाठ म्हणाले, प्रशासन गांभीर्याने विचार करत नसून तार बसवण्यासाठी टाळाटाळ करत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक प्राण्यांना जीव गमवावा लागला असून पावसाळा सुरु होत असल्याने ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावला नाही तर आणखी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तारा बसवल्या नाही तर १५ जून पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.