धातूच्या पाईपमधून त्यांनी आणले ५ कोटींचे सोने

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुबईतून न्हावा शेवा बंदरावर आलेल्या कंटेनरमध्ये धातूच्या पाईपमध्ये चक्क ५ कोटी ५४ लाख रुपयांचे १९ किलो सोने तस्करी करुन आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शौर्य एक्झिमचे मालक राजेश भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर महासंचालनालयाने शुक्रवारी ही कारवाई केली.

दुबईहून आयात केलेल्या सामुग्रीमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानंतर त्यांनी वाशी येथील न्हावा शेवा बंदरात दुबईहून आलेल्या सर्व कंटेनरची तपासणी सुरु केली. त्या हिंद टर्मिनलमध्ये आलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी धातूच्या पाईपमध्ये लपवून हे सोने आणले होते. या पाईपला एका बाजूने बंद केले होते. त्यात सोन्याचे बार लपविले होते. दुसऱ्या बाजूने या पाईपला नट व बोल्ट लावून बंद केले होते. पाईपमधून २४ कॅरेटचे १६३ बार लपवून आणले होते. त्यांचे वजन १९ किलो इतके आहे. बाजारात सध्या त्याची किंमत ५ कोटी ५४ लाख रुपये इतकी आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतून डीआरआयने १३५ किलो सोने जप्त केले आहे. परदेशातून वितळविण्याजोग्या वेगवेगळ्या धातूंचे भंगार आयात करुन त्यात दडवून तब्बल २०० किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आला होता. महसुल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)ने आतापर्यंत केलेल्या कारवाईत हे सर्वाधिक मोठी कारवाई ठरली आहे.