पक्षविरोधी कारवाया करणारे पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र, ममतांनी भरला दम

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूलमध्ये गळती सुरू झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने तृणमूलचे अनेक आमदार संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शुभेंदू अधिकारी यांच्याबरोबरची शिष्टाई यशस्वी ठरल्य़ानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पक्षातील नेत्यांना दम भरला आहे. जे लोक पक्षविरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले आहे. ममता यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.

शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची ममता यांनी बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी असा एक नेता गेला, तर त्याच्यासारखो लाख नेते आपण बनवू शकते, असे म्हटले होते. तसेच ममता यांनी शुभेंदू यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपूरचे टीएमसी प्रमुख तसेच कांथीचे खासदार शिशिर अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांना पक्षविरोधी कारवाया थांबविणे व जिल्हा संघटनेतील विरोध संपविण्यास सांगितले आहे.

शेतकरी आंदोलनाला तृणमूलचा पाठिंबा
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे, याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकारसोबत चर्चेची पाचवी फेरी आज होत आहे. ८ डिसेंबरला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. यामुळे ममता यांनीदेखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. ८ डिसेंबरला मध्य कोलकातामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तीनदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे आदेश ममता यांनी तृणमूलच्या शेतकरी संघटनेला दिले आहेत.

शुभेंदूचे बंड
तृणमूल पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक शुभेंदू अधिकारी आहेत. सरकारमध्ये परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. दरम्यानच्या काळात म्हणजे गेल्या वर्षभरापासून ममता सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकांना त्यांची अनुपस्थिती होती. तसेच ते तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. ते भाजपत दाखल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.