कोरोना, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, शिक्षक या प्रश्नांवर ‘महाविकास आघाडी’ पूर्णपणे अपयशी : रावसाहेब दानवे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना, महिलांवर होणारे अत्याचार, मराठा आरक्षण, शिक्षक या प्रश्नांवर महाविकास आघाडीचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. म्हणून आपले अपयश झाकण्यासाठी राज्यातील सरकार केंद्रातील मोदी सरकारकडे बोट दाखवत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. २९) केला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांत समन्वय नसल्याचे त्यांनी दानवे यांनी सांगितलं.

येथे रावसाहेब दानवे यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी शिरीष बोराळकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर आदी उपस्थित होते. दानवे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. वास्तविक पाहता हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. राज्यातील सरकारचे अपयश दाखवून देणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. राज्यात आजवर पंधरा पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत त्यांनी याबाबतची यादीच वाचून दाखवली.

शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावरही हे सरकार गंभीर नसून, शाळा सुरू करण्यासंदर्भात यांच्यात ताळमेळ नाही. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केव्हा घेणार याचे उत्तर सरकारकडे नाही. कोरोनाचा प्रश्न हाताळण्यास सरकार अपयशी ठरले. महिलांवर अत्याचाराच्या घटना वर्षभरात वाढल्या. कोविड सेंटरमध्येसुद्धा हे पाहण्यास मिळाले. कोरोनादरम्यान, व्हेंटिलेटर, मास्क असे साहित्य पुरवूनदेखील केंद्राकडून जीएसटीचे पैसे दिले जात नसल्याचा बोभाटा केला जात असल्याचे दानवे म्हणाले.

गायकवाड हे आमचे काका
भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपमध्ये रावसाहेब दानवे यांची कोंडी करण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यावर दानवे यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळत सांगितलं, गायकवाड हे आम्हा सर्वांचे काका आहेत आणि आम्ही त्यांचे पुतणे. काका-पुतण्यामधील संबंध राज्यात सर्वश्रुत आहे.