त्यांनी बीडीओंच्या (BDO) डोक्यात फोडली शाईची बाटली

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अमरावती येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानित केलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या डोक्यावर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईची बाटली फोडली. ही घटना पंचायत समितीत घडली. पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराने अधिकारी, कर्मचारी संतप्त झाले होते. शेवटी या प्रकाराविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना न्याय देणे, दिव्यांगांचा पाच टक्के निधी वितरित करणे, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करणे, वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे, या समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते तेल्हारा पंचायत समितीचे बीडीओ राजीव फडके यांच्याकडे आले होते. यावेळी फडके व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

या वादाचे रूपांतर हमरीतुमरीत झाल्यानंतर पंचायत समितीतील वातावरण तापले होते. यातच प्रहार संघटनेचा युवक तालुकाप्रमुख प्रफुल्ल दबडघाव याने फडके यांच्या डोक्यावर शाईची बाटली फोडली. यामुळे फडके यांच्या डोक्याला दुखापत होऊन डोळ्यालाही इजा झाली. याप्रकरणी फडके यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. गट विकास अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तेल्हारा तालुका सर्व शिक्षक समन्वय समितीने तीव्र निषेध केला आहे. तसेच काळ्या फिती लावून काम करण्यात आले.