धक्कादायक ! पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विवाहितेला करत होते ‘विवस्त्र’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – अमावास्येच्या रात्री देवाची पूजा करून पैशाचा पाऊस पाडायचा असल्याचे सांगून एका विवाहितेला विवस्त्र होण्यासाठी बळजबरी करणाऱ्या तेरा जणांविरुद्ध ३१ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार केल्याने कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता २० डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील कळंकी येथे घडली आहे.

सायंकाळी ही महिला मुलांसह घरात असताना गावातील रामभाऊ लक्ष्मण शिंदे (रा. कळंकी, ता. कन्नड) हा घरी आला. शेतातील घरात पूजा करायची असल्याचे सांगत त्याना तिला तेथे येण्यासाठी गळ घातली. परंतु महिलेने त्यास नकार दिल्याने मी मुझ्या वडिलासमान असल्याचे सांगून तो तिला शेतात घेऊन गेला. परंतु, तेथे आधीच काही मांत्रिक बसलेले होते. त्यांनी कोळशाचे रिंगण करून अगरबत्ती, लिंबू, हळद-कुंकू, गुलाल आदी साहित्य ठेवलेले होते.

हा सर्व प्रकार पाहून घाबरलेल्या विवाहितेने याची चौकशी केली असता येथे पैशाचा पाऊस पाडायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर महिलेला अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. परंतु, यास तिने नकार देताच तिच्या अंगावरील कपडे फाडा, असे म्हणत आरोपींनी तिचा विनयभंग केला. तिच्याशी हुज्जत घालत तिला कपडे काढण्यास प्रवृत्त करताच तिने आरडाओरड करत तेथून पळ काढला. याप्रकरणी महिला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना आरोपींनी तिला विरोध केला. अखेर महिलेने तेरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रामभाऊ शिंदे (रा. कळंकी), नवनाथ आडे, चांगदेव जाधव, नामदेव मागू राठोड, ताराचंद, (सर्व रा. सीतानाईक तांडा), रेहमान (रा. मुंगसापूर, ता. कन्नड), बन्सी आलू आडे (रा. बोलटेक), सोपान कचरू साळुंके (रा. कोलवाडी) यासह चापाणेर येथील एक आणि इतर चार अनोळखी व्यक्ती अशा तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.