पक्षांतर केलेल्यांचा पराभव ‘अटळ’, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा दावा

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेतील बदलेल्या स्थितीचा अंदाज घेऊन विधानसभेतही तसेच होईल, असा अंदाज घेऊन ज्यांनी पक्षांतर केले, त्यांचा निर्णय १०० टक्के चुकणार आहे. लोकांना हे उड्या मारणे आवडलेले नसून त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.

एका कार्यक्रमासाठी ते संगमनेरला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारण हे केवळ पदाचे नसते तर ते तत्त्वाचेदेखील असायला हवे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने सरकारचे भान हरपले असून काही केले तरी लोक आपल्यालाच मते देतात, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांचा हा गैरसमज दूर करेल. पुराकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष, अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांची दुरावस्था अशा अनेक बाबींमुळे निवडणुकीत त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील.

आपल्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या विरोधात शालिनी विखे यांना उमेदवारी द्यायची का हा निर्णय विखेंचा आहे. असे थोरात यांनी सांगितले.