महागड्या कारमधून येऊन घरफोड्या व चोऱ्या करणाऱ्यांना बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महागड्या कारमधून येऊन शहरातील घरे, दुकानांवर हात साफ करणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ गुन्हे उघड करत १४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (३२, डीपी रोड औंध), नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव (२५, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

येरवडा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर दोघांनी शहारत दिवसा तसेच रात्री चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्यांना कोणी ओळखू नये यासाठी ते सुट बुट घालून शेवरोलेट कंपनीच्या कॅप्टीवा कारमधून येत असत व ती कॅमेरा नसलेल्या ठिकाणी आडबाजूला उभी करत असत. त्यांतर घरफोड्या करत होते. त्यांच्यावर एकूण ८८ चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून ८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २० ग्रॅम चांदी, ९७ हजार रोख, एक सोनी कंपनीचा एलसीडी टिव्ही, चोरीच्या पैशातून घेतलेली शेवरोलेट कॅप्टीवा कार असा १४ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.