मीरारोड : सराईत चोरटयाचा पोलीस कोठडीतून पोबारा

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाईन –  पोलीस ठाण्यातील शौचालयाची जाळी तोडून सराईत चोरटा पसार झाल्याची घटना मीरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात घडली आहे. या घटनेने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात सुमारे 6 गुन्हे दाखल असल्याचे समजते. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत, परंतू रात्रीपर्यंत त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.

समीर अकबर शेख (वय 30 रा. गेट क्र 7 मालवणी, मालाड ) असे पसार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नयानगर पोलिसांनी गस्ती दरम्यान सोमवारी (दि. 25) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सराईत चोरटा समीर यास अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण व पथकाने समीरला अटक केल्यानंतर नयानगर पोलीस ठाणे इमारतीतील लॉक अपमध्ये ठेवले होते. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान समीरने शौचालयास जायचे सांगितल्याने पोलिसांनी त्याला पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. परंतु बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नसल्याने पोलिसांनी पडताळणी केली असता शौचालयाच्या खिडकीस असलेली एल्युमिनियनची जाळी तोडून तो पाईप वरून खाली उतरून पळून गेल्याचे उघडकीस आले. आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्याने पोलीस वर्तुळात एकाच खळबळ उडाली.