चोरी करण्यासाठी गेला चोर, घर कर्नलचे असल्याचे समजताच जागी झाली ‘देशभक्ती’

तिरूवनंकुलम : वृत्त संस्था – केरळमध्ये चोरीचा एक असा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरला. जेव्हा त्याला समजले की ज्या घरात तो चोरी करत आहे ते एका कर्नलचे आहे तेव्हा त्याच्या आतील देशभक्ती जागी झाली.

हा प्रकार केरळच्या तिरुवनंकुलम येथील आहे. येथे चोर घरात चोरी करण्यासाठी घुसल्यानंतर त्याला समजले की हे घर निवृत्त कर्नलचे आहे. प्रथम त्याने 1500 रुपये चोरले, त्यांनतर त्याने कर्नलच्या वार्डरोबमधून एक दारूची बाटली घेतली आणि नंतर त्याने जे भिंतीवर लिहिले ते सध्या व्हायरल होत आहे.

चोराने भिंतीवर माफीनामा लिहिला आहे. प्रथम त्याने बायबलमधील काही ओळी लिहिल्या, त्यानंतर लिहिले की, मला माहित नव्हते की, हे घर लष्कराच्या अधिकार्‍याचे आहे. अन्यथा मी या घरात चोरी करण्यासाठी आलो नसतो. लष्कराची कॅप पाहिल्यानंतर मला समजले. कृपया मला माफ करा.

चोराने पुढे लिहिले आहे की, मी बायबलमध्ये लिहिलेल्या सातव्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. एवढे लिहिल्यावर चोर तेथून निघून गेला.

चोराने कर्नलच्या घरात आणखी एक बॅग टाकली जी त्याने एका टायरच्या दुकानातून चोरली होती. ही बॅग परत करण्यासाठी चोराने पत्ताही लिहून ठेवला. रिटायर्ड कर्नल दोन महिन्यांसाठी कुटुंबासह बाहेर गेले होते. सकाळी जेव्हा नोकर सफाईसाठी आला तेव्हा त्याने चोराचा माफीनामा पाहून पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकार्‍यांनी म्हटले की, दिशाभूल करण्यासाठी चोराने हे सर्व केलेले असू शकते. या चोरीचा तपास सुरू आहे.