युवकाला लुटणाऱ्या चोरट्यांसह टीप देणारा रिक्षाचालक 24 तासात गजाआड

तुळजापूर : पोलीसनामा ऑनलाइन – डोळ्यात मिरची पावडर टाकून एका २२ वर्षीय युवकास लुटलेल्या तीन चोरट्यांसह चोरट्यांना टीप देणाऱ्या रिक्षा चालकास तुळजापूर पोलीसांनी सोलापूर येथून अटक केली. यातील दोन चोरटे फरार असून पोलीस तपास करीत आहेत. लवकरच फरार चोरटे हाती लागतील अशी शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. ही कार्यवाही डीबी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

दाऊतसैपन शेख (रा.मुल्लाबाबा टेकडी, सोलापूर), राहुल विजय साळुंके (रा. संतोष नगर बाळे, सोलापूर), रजिवान शेख व रिक्षावाला अक्षय प्रकाश दळवी (रा.बाळे सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी चोरट्यांना चोवीस तासात अटक केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी योगेश दत्तात्रय मारकड (वय २२ वर्षे रा.माढा ता.माढा जि.सोलापूर, हल्ली मुक्काम भुम जिल्हा.उस्मानाबाद) हा सोलापूर येथील पणजी गंगुबाई विश्वनाथ बंडगर यांच्या सोबत कॅनरा बँकेत गेला. पणजीच्या खात्यातून २ लाख ५० हजार रूपये काढून ते पैसे घेऊन भुम येथे दुचाकीवरून जात होता. त्यावेळी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर-उस्मानाबाद हायवेवर तुळजापूर जवळील सांगवी मार्डी व सिंदफळ गावाच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागे नंबर नसलेल्या पल्सर गाडीवर दोन इसम आले. गाडी एवढी जोरात का चालवतोस, तुझ्या गाडीमुळे उडणारी धूळ आमच्या डोळ्यात जाऊन अपघात झाला, तर तु भरून देशील का ? असे म्हटल्याने योगेश मारकड याने गाडीची स्पीड कमी केल्याने पल्सर गाडीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने गाडीला लाथ मारल्याने योगेश मारकड हा खाली पडला.

त्याच वेळी आणखी दोन अनोळखी इसम पाठीमागुन विनानंबरच्या डीलक्स गाडीवर आले व त्या चौघांनी मिळून पोलीस स्टेशनला चल असे म्हणत त्यातील दोघांनी मारकड याची गाडी घेऊन दोघांच्या मध्ये बसवून व इतर दोन इसम त्यांच्या पाठीमागे तुळजापूर कडे येत होते. त्यांनी अचानक तिन्ही गाड्या बार्शी रोडकडे वळवल्या. योगेश मारकड यास कासारी गावाच्या जवळ नेऊन आपण काही तरी सेटलमेंट करू असे म्हणत गाड्या थांबवून रोडच्या खाली एका शेतामध्ये घेऊन जाऊन मारहाण केली. डोळ्यात मिरची पावडर टाकून जवळील २ लाख ५० हजार रुपयांची रोख असलेली बॅग व एक मोबाईल चोरून घेऊन गेले. यावरून तुळजापूर पोलीस ठाण्यात योगेश मारकड याच्या फिर्यादीवरून चार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र हाती घेऊन उपविभागीय पोलीस अधीकारी डाॅ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ नोव्हेंबर रोजी सपोनि चव्हाण, पो ना आनंद गायकवाड,पो ना कमलकिशोर राऊत, पो काॅ ज्ञानेश्वर माळी, पो काॅ अमोल पवार, पो ना सचिन राऊत यांच्या पथकाने अनोळखी संशयीत आरोपीचे सोलापूर रोडवरील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज वरून अनोळखी इसम चोरी करून सोलापूर दिशेने गेल्याचे संशय पोलीसांना आल्याने, तुळजापूर पोलीस सोलापूर कडे रवाना होऊन शहरात जाऊन रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक केले, बँकेत खात्री केली परंतु पोलिसांना उपयुक्त माहिती मिळाली नाही.

म्हणून पोलीसांनी मारकड याच्या पणजी कडे उलट चौकशी करून पैसे काढत असताना याची माहिती कोणाला होती अशी विचारणा केली. पोलीसांना सुगावा लागल्याने तात्काळ सोलापूर बाळे येथून एका रिक्षा चालकास ताब्यात घेतले. त्यास फौजदारी चावडी सोलापूर पोलीस स्टेशन येथील डी बी पथकाची मदत घेऊन संशयीत आरोपी चा फोटो हस्तगत केला. तो फोटो मारकड यास दाखवून खात्री झाल्याने रिक्षा चालकाची उलट चौकशी केली. रिक्षा चालकानेच टीप देऊन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने, पोलीसांनी सापळा रचून बुद्धी कौशल्य वापरून दोन आरोपींना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी गुन्ह्यामध्ये सहा आरोपी मिळून प्लँन करून गुन्हा केल्याची कबुली दिली व काही रक्कम ही काढून दिली असून इतर दोन आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com