Pune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी फोडले, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकाच सोसायटीतले 3 फ्लॅट व अन्य एका ठिकाणचा एक फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी व कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात शेखर गोरडे (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोंढवा खुर्द येथील रुक्मिणी अपार्टमेंट परिसरात राहतात. दरम्यान ते 17 ते 21 सप्टेंबर या कालावधीत घराला कुलूप लावून गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. काल हा प्रकार फिर्यादी आल्यानंतर उघडकीस आला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

तर बिबवेवाडी भागात चोरट्यांनी एकाच इमारतीमधील 3 फ्लॅट फोडुन चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत आकाश सांडभोर (वय 28) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आकाश हा येथील अटल को.ऑप. सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान त्यांचा फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी कडी कोयडा तोडून आत प्रवेश केला. तसेच चोरीचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काही लागले नाही. तर यासोबतच चोरट्यांनी फिर्यादी यांच्या शेजारील आणखी दोन बंद फ्लॅट फोडले. पण तेथून काही हाती लागले नाही. चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने त्यांनी पार्किंगमध्ये असणाऱ्या कारची काच फोडून 2 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.