पुण्यात विलगीकरण केलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात अनेक कुटुंब विलगीकरणं करून त्यांना इतर ठिकाणी ठेवण्यात आले असून, पाटील इस्टेट परिसरात एका कुटुंबाला क्वारंटाइन  केल्यानंतर त्यांचे घर चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांचे विलगीकरण केले जात आहे. तसेच, या ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे त्यांची महापालिकेच्या शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था केली जात आहे. तक्रारदार यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियाचे १४ एप्रिल रोजी शिवाजीनगर परिसरात विलगीकरण केले होते. त्यामध्ये फिर्यादींचे कुटुंब देखील होते. विलगीकरणाचा १४ दिवसाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर घरी आले. त्यावेळी त्यांच्या घराला बाहेरून दुसरेच कुलूप लावल्याचे दिसले. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिल्यानंतर टीव्ही, सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख सात हजार असा ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले. करोनाच्या भितीने अगोदरच हैराण झालेल्या कुटुंबाला या घटनेने धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.