पर्रिकरांच्या अंत्ययात्रेत व्हाईट कपड्यात खिसेकापू टोळीचा हैदोस

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनासाठी जसे गोव्यातील कानाकोपऱ्यातून लोक पणजीत धावून आले. तसेच आणखी काही जण धावून आले. त्यात खिसेकापुही आले. पणजी पोलिसांकडे ३२ लोकांचे खिसे साफ केल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यातील १३ चोरट्यांना पोलिसांनी पकडलेही आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करतानाच अंत्यसंस्काराच्या विधीचे वेळापत्रकच दिले होते. पार्थिव सकाळी भाजप मुख्यालयाजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ११.३० ते ४.३० पर्यंत कांपाल येथे कला अकादमीत तर नंतर तेथून मिरामार येथे नेऊन अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळापत्रकाची आगाऊ माहिती मिळाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार याचा अंदाज असल्यामुळे या खिसेकापूंनी संधी साधली.

अंत्ययात्रेला पांढऱ्या वेशात जाण्याची पद्धत आहे. सर्व खिसेकापू पांढरा शर्ट घालूनच आले होते. भाई भाई करीत गर्दीत मिसळले आणि त्याच गर्दीत लोकांच्या खिशातील पाकिटे चोरली. १३ जणांना पाकिटे मारतानाच लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. भाजपा मुख्यालयाकडे, कला अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मिरामार या तिन्ही ठिकाणी या खिसेकापूनी आपली कला दाखविण्याचा प्रयत्न केला. एक खिसेकापूने तर दोन जणांची पाकीटे चोरली होती व तिसरे चोरताना तो पकडला गेला. तब्बल १३ जण पकडले गेले.

रात्री उशिरापर्यंत ३२ जणांनी आपले खिसे कापले गेल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. मात्र, त्याशिवाय अनेकांचे खिसे कापले गेले असल्याची शक्यता आहे. ज्यांनी तक्रार न देता घरचा रस्ता पकडला.