चोरांची दहशत, मोबाईल पळवून युवकावर 3 वेळा गोळीबार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- भिवंडी तालुक्यातील भादवड परिसरातील तरे कंपाऊंडमध्ये लूटमारीच्या इराद्याने आलेल्या चोरांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात सदर युवक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भिवंडी शहर व ग्रामीण भागात लूटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

कामाक्षा प्रसाद साहू (30) असे जखमी झालेल्या युवकाचा नाव आहे. सदर चोरांनी या युवकावर तीन वेळा गाेळीबार केला. या गोळीबारात युवाकाला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. यानंतर स्थानिकांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला भिवंडीजवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जात आहे.

कामाक्षा हा युवक भिवंडी तालुक्यातील भादवड येथील तरे कंपाऊंड येथे एका मित्राला भेटायला जात होता. तो एकटाच होता. हे पाहून का मोटरसायकलवरून तीन चोरटे त्या ठिकाणी आले. चोरट्यांनी कामाक्षाला रस्त्यात अडवून त्याच्या जवळ असलेला मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याच्या खिशातील पैशाचे पाकीटही काढून घेतले. खिशातील पैशाचे पाकिट हिसकावल्यानंतर मात्र त्याने त्या चोरट्यांना विरोध करायला सुरुवात केली. यानंतर त्यांच्यात आधी बाचाबाची आणि नंतर झटापटही झाली. यानंतर त्यातील एकाने त्याला धक्का मारला आणि जमिनीवर पाडले.

यानंतर ते चोर तिथून पळ काढू लागले. परंतु या युवकाने मोठे धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यातील एकाला पकडून ठेवले. आपल्या साथीदाराला पकडून ठेवल्याचे पाहिल्यानंतर त्यातील एका चोरट्याने कसलाही विचार न करता च्याजवळची बंदूक काढून युवकावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या युवकाच्या मांडीत लागल्या, त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. गोळीबारीचा आवाज ऐकून स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी कामाक्षाची मदत केली. स्थानिकांनी लगेच त्या युवकाला भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस या चोरांचा तपास करत आहेत. शिवाय कामाक्षा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.