Coronavirus : PPE कीट घालून किराणा, मेडिकलच्या दुकानमध्ये चोरट्याचा ‘डल्ला’

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरामध्ये आहेत. याचा फायदा चोरटे घेत आहेत. लॉकडाऊन काळात पोलीस रस्त्यावर तैनात असताना देखील चोरटे दुकानांमध्ये चोरी करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी चोरी करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चोरट्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत रावेत येथील किराणा आणि मेडिकल दुकानात चोरी केली. परंतु ही चोरी करताना दोन चोरट्यांनी चक्क डॉक्टरांचे पीपीई कीट परिधान केल्याचे समोर आले आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

सचिन झरकर यांचे रावेत येथे किराणा मालाचे दुकान आहे. हे दुकान बंद असताना शुक्रवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास पीपीई कीट परिधान केलेले दोन चोरटे दुकानाचे शटर उचकटून दुकानात शिरले. त्यांनी दुकानातील आठ हजार रुपयाची रोकड लंपास केली. तसेच दुसऱ्या एका ठिकाणी चोरी करून सहा हजार रुपये चोरून नेले. ही घटना सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून त्यांनी डॉक्टर परिधान करीत असलेले पीपीई कीट परिधान केल्याचे दिसून येत आहे. आपण कोणाच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरट्यांनी पीपीई कीट परिधान करून चोरी केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.