विश्वेश्वर सहकारी बँकेचे ATM उघडून चोरट्यांनी केली 5 लाख 72 हजारांची चाेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वेश्वर सहकारी बँकेचे एटीएम उघडून चोरट्यांनी 5 लाख 72 हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएम मशीन चोरी व त्यातून पैसे काढून नेणाऱ्या या टोळीने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात चांगलाच धुमाकूळ घातला असल्याचे यावरून दिसत आहे.

या प्रकरणी बँकेचे सहायक व्यवस्थापक समीर बंकापुरे (वय 37, रा. सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वेश्वर सहकारी बँक बाणेर रोड शाखेचे फिर्यादी हे सहायक व्यवस्थापक आहेत. या शाखेचे एटीएम सेंटर आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. एटीएम मशीनचे लॉक खराब असल्याचा फायदा घेऊन ते लॉक उघडले. त्यामध्ये असलेले तब्बल 5 लाख 72 हजार रुपये काढून चोरून नेले. शुक्रवारी दुपारी काही व्यक्ती पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर पैसे निघाले नाहीत. तसेच, पैसे कमी झाल्याचा मेसज आला. त्यामुळे त्याच्या तक्रारी करण्यासाठी काहीजण बँकेत गेले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केल्यानंतर दोन चोरटे दिसत आहेत. त्यांनी मास्क घातल्यामुळे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. सीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत.

You might also like