चोरट्यांनी चक्क ATM मशीनच चोरुन नेलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड लांबविण्यास लागणारा वेळ लक्षात घेता आता चक्क एटीएम मशीनच मुळापासून ओढून घेऊन चोरुन जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. चाकण येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी नवनाथ उत्तम कणसे या अधिकाऱ्याने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

एचडीएफसी बँकेचे चाकणमधील चंद्रश्री कॉम्प्लेक्समधील गाळ्यात एटीएम सेंटर होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉपिओमधून चोरटे तेथे आले. एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नव्हता. त्यांनी एटीएम मशीन भोवती रोप गुंडाळला. तो रोप स्कॉपिओला बांधला व गाडी ओढली. त्याबरोबर मशीन मुळासकट उचकटली गेली. त्यानंतर त्यांनी ते मशीन गाडीत टाकून चोरुन नेले.

एटीएम मशीनमध्ये १६ लाख ९६ हजार रुपयांची रोकड व २ हजार ७०० रोख तसेच २ लाख रुपयांचे मशीन असा एकूण १८ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा माल चोरट्यांनी लांबविला. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता पांढऱ्या रंगाची स्कॉपिओ गाडी दिसून येत असून त्यातील दोघा चोरट्यांनी हे कृत्य केल्याचे दिसत आहे. मात्र, गाडीचा नंबर दिसून आला नाही. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहे.

Visit : Policenama.com