दारूसाठी काय पण, वर्ध्यात तळीरामांनी केला ‘कहर’, पोलीसही गेले चक्रावून !

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशभरात मागील 20 दिवसांपासून लॉकडाउन करण्यात  आले आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वकाही बंद करण्यात आले आहे. परिणामी तळीरामांची गोची झाली असून मद्यपान करण्यास संधी न मिळाल्याने अनेकांकडून विविध क्लृप्ती केली जात आहे. अशीच एक घटना वर्ध्यात घडली असून तळीरामाने घसा ओला करण्यासाठी चक्क उत्पादन शुल्क विभागाच्या मालखान्यातच हात साफ केला आहे.

शहर पोलिसांनी निलेश फुलहार, मनोज उईके, सुनील वनकर, बबलू ठाकूर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला. देशभरात लॉकडाउनमुळे बार, दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही चोरट्या मार्गाने दारू विकणार्‍याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. त्यांच्याकडून जप्त केलेला दारूसाठा, मुद्देमाल वर्ध्यातील आरती चौकातील मालखान्यात ठेवण्यात आला होता. चोरट्यांनी या मालखान्यालाच लक्ष्य करुन दारू चोरली आहे. मालखान्याच्या खिडक्यामधून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दारूसाठा लंपास केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, लॉकडाउनमुळे तळीरामांचा घसा दारूअभावी कोरडा झाला आहे. त्यामुळे दारूच्या गोदामासह दुकान फोडले जात आहे.