माजी नगरसेवकाच्या घरा समोरुन फॉर्च्यूनर कारची चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफीच्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज रहाटणी येथे माजी नगरसेवकाच्या घरासमोर पार्क केलेली फॉर्च्यूनर कार चोरट्यांनी पळवून नेली. हा प्रकार आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास घडला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

याप्रकरणी दिनेश बाळू चिंचवडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन वाहनाचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिंचवडे यांनी त्यांची फॉर्च्यूनर कार माजी नगरसेवकर कैलास थोपटे यांच्या घरासमोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून कार चोरुन नेली. चोरटे कार घेून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

दारुसाठी डोक्‍यात घातला दगड

पिंपरी : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्‍यात दगड घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 11) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बॅंकेसमोर घडली.अनिल भीमराव नाईकवाडे (वय-49, रा. जयमल्हार कॉलनी, थेरगाव) असे यामध्ये जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. सोमनाथ घोगरे (रा. गुरुनानकनगर, साने गुरुजी शाळे मागे, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बॅंकेसमोरुन अनिल नाईकवाडे पायी चालले होते. यावेळी सोमनाथ त्यांच्याजवळ आला आणि दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र नाईकवाडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या घोगरे याने रस्त्यावरील दगड नाईकवाडे यांना फेकून मारला. तो दगड नाईकवाडे यांच्या कानावर लागला आणि ते गंभीर जखमी झाले. वाकड पोलीस तपास करत आहेत.