‘केजीएफ’ चा सुपरहिरो यशबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का? 

मुंबई : वृत्तसंस्था – कन्नड सिनेमा केजीएफ हा सध्या चर्चेचा विषय आहे. कमी कालावधीतच या सिनेमाने 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदीतही 40 कोटींहून अधिक कमाई केली आहे. याच काळात अभिनेता रणवीर सिंगचा सिम्बा आणि शाहरुखचा झिरो या चित्रपटांनाही केजीएफने तोडीची टक्कर दिली आहे.

केजीएफचा मुख्य अभिनेता यश आहे. त्याने अनेक चित्रपटामध्ये कामही केले आहे. या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम काम केले आहे. यशचे खरे नाव कुमार गौडा असे आहे. त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने चित्रपटात सहायक कलाकाराची भूमिका केली. त्याची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. त्याने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत 18हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याच्या कामामुळे आणि यशामुळे त्याची गणना साऊथच्या सुपरस्टारमध्ये होते.
 यशने त्याच्या कामाच्या जोरावर पैसा, प्रसिद्धी आणि यश सर्व मिळवलं. त्याची एकूण 40 कोटीहून अधिक प्रापर्टी असून त्याचा बंगलुरूमधील बंगला हा तब्बल तीन कोटींचा आहे. यश एका  चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये मानधन घेतो.

यशकडे एवढा पैसा असला तरी आजही त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणूनच काम करतात. त्यांनी हे काम करण्यामागे एक खास कारण आहे. यशचे वडील बस ड्रायव्हर आहेत हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते. पण त्यांनी आपल्या मुलांसाठी जे काही केले, ते ऐकल्यावर तेच खरे हिरो असल्याची मला जाणीव झाली, असं बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
बस ड्रायव्हर म्हणून काम करत असल्यानेच यशला वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आले. त्यांच्या या प्रोफेशनमुळेच त्यांच्या मुलाला इतके यश मिळाले. त्यामुळेच ते आजही बस ड्रायव्हर म्हणूनच काम करत आहेत.

दरम्यान, यशचे अनेक चित्रपट हिंदीतही हिट झाले आहेत. त्याचा केजीएफ सिनेमा कर्नाटकमधील सोन्याच्या खाणीवर आधारित आहे. एका लहान मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच्या या चित्रपटात तो डॉन कसा होतो, त्यासाठी काय काय करतो, असं याचे कथानक आहे. हा चित्रपटाचा दुसरा भागही येणार आहे. त्यामुळे केजीएफनंतर प्रेक्षकांमध्ये त्याच्या दुसऱ्या भागाचीही उत्सुकता आहे.