कामाची गोष्ट ! कार आणि दुचाकीचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ महागणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील आर्थिक वर्षापासून कार आणि दुचाकींचा थर्ड पार्टी विमा (Third Party Insurance) महाग होऊ शकतो. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने 1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी थर्ड पार्टी विम्यात मोठी वाढ होण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, 1,000-सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम 2,182 रुपये असेल, जे की सध्या 2,072 रुपये आहे. त्याचप्रमाणे, 1,000-1,500-सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियम वाढवून 3,383 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी प्रीमियम दर न वाढवण्याचा प्रस्ताव आहे. दुचाकीस्वारांच्या बाबतीत, 75-सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असणाऱ्या वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा 506 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे.

इलेक्ट्रिक प्रायव्हेट कार आणि इलेक्ट्रिक बाईकवर १५ टक्क्यांची सूट
IRDAI ने सिंगल प्रीमियमच्या दरात बदल केलेले नाहीत. इलेक्ट्रिक प्रायव्हेट कार आणि इलेक्ट्रिक बाईकसाठी थर्ड पार्टी प्रीमियममध्ये १५ टक्क्यांच्या सुटचा प्रस्ताव आहे. ई-रिक्षाचा प्रीमियम वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, परंतु स्कूल बस प्रीमियम वाढू शकेल. यासह ट्रॅक्टरचा प्रीमियमही वाढू शकतो.

काय आहे थर्ड पार्टी विमा?
वाहनांचा विमा दोन प्रकारे केला जातो. पहिला, स्वतःचे नुकसान (ऑन डॅमेज) आणि दुसरा, थर्ड पार्टी (टीपी). रस्ता अपघातात झालेल्या वाहनाच्या नुकसानीसाठी ऑन डॅमेज कव्हर देतो. थर्ड पार्टी विमा इतर व्यक्तींच्या प्रति असलेल्या कायदेशीर जबाबदाऱ्यांविरुद्ध संरक्षण देतो. ज्यामध्ये मृत्यू, इजा, वाहनाचे नुकसान किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश होतो.