राज्यात खासगी कार्यालये सुरु, पण प्रवासांसाठी साधनेच नाहीत, उपनगरामध्ये बससाठी ‘झुंबड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मिशन बिगिन अगेनचा तिसर्‍या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून खासगी कार्यालये १० टक्के कर्मचार्‍यांसह सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उपनगरातून मुंबईत येण्यासाठी आज सकाळपासून लोकांनी गर्दी केली आहे. मात्र, सामान्यांसाठी लोकल बंद असल्याने बेस्टसाठी ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागल्याचे दृश्य सर्वत्र दिसून येत आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी सोडण्यात येणार्‍या लोकलमध्येही तुडुंब गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. कामासाठी जाणारे रेल्वे कर्मचारी तसेच मुंबई महापालिकेतील कर्मचारी या सर्व प्रकाराने त्रस्त झाले आहेत. अनेक कंत्राटदारांची माणसे लोकलमधून सर्रास प्रवास करीत असून रेल्वे स्टेशनवर लोकलमध्ये चढणारे कोण आहेत, याची शहानिशा कोणीही करीत नसल्याची त्यांच्या तक्रारी आहेत.

दिवा, डोंबिवली येथून मुंबई येणार्‍या चाकरमान्यांच्या एस टी बससाठी लांबच्या लांब रांगा पहायला मिळत आहेत. डोंबिवली येथे तर प्रवाशांची रांग २ किमीपर्यंत रांग केली होती. मुंबईकडे येणार्‍या सर्वच रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. मानपाडा येथे वाहतूक कोंडी झाली असून जवळपास १ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत़. सामान्यांसाठी लोकल बंद आणि बससेवा अपुरी यामुळे कामावर जायचे कसे असा प्रश्न चाकरमानी उपस्थित करीत आहेत.