×
Homeक्राईम स्टोरीकारागृहातील कोविड उपचार केंद्रातून 13 कैद्यांनी ठोकली धूम, प्रचंड खळबळ

कारागृहातील कोविड उपचार केंद्रातून 13 कैद्यांनी ठोकली धूम, प्रचंड खळबळ

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणामधील रेवाडी कारागृहातील कोविड उपचार केंद्रातून 13 कैद्यांनी धूम ठोकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारागृहात शनिवारी आणि रविवार दरम्यान रात्री ही घटना घडली. कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तुरुंग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत चौकशी केली जात आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त कैद्यांसाठी सध्या रेवाडी तुरुंगाचे रुपांतर कोविड उपचार केंद्रात केले आहे. राज्यातील विविध भागातील 493 कोरोनाबाधित कैद्यांना तुरुंगातील विशेष कक्षात ठेवले आहे. यातील 13 कैद्यांनी बराकीची लोखंडी जाळी कापली. अंथरुण- पांघरुणांच्या दोरीचा वापर करून त्यांनी तुरुंगातून धूम ठोकली. रेवाडी आणि महेंद्रगढमधील खून, चोरी, बलात्काराचे गुन्हे असलेल्या कैद्यांचा यात समावेश आहे. त्यांना नरनौल तुरुंगातून रेवाडी येथे आणले होते. सकाळी कैद्यांची नियमित हजेरी घेताना 13 कैदी बेपत्ता असल्याचे आढळल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. रेवाडी पोलीस नरनौलसह शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांशी समन्वय साधत असल्याचे एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Must Read
Related News