थर्टी फर्स्टला मुंबईसह पुण्यात ही रात्रभर (हॉटेल, पब,  मॉल) सुरु ठेवावीत – आदित्य ठाकरे  

मुंबई  पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे, की विशेष करुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ही परवानगी तातडीने दिली जावी. अनिवासी भागातील मनोरंजनाची ठिकाणे (हॉटेल, पब,  मॉल) रात्रभर सुरू ठेवली जावीत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यांसारख्या अनेक शहरवासीयांना नवीन वर्षाचे आगमन साजरे करण्याची इच्छा आहे. तरी, आपण कायदेशीर मनोरंजनाची व आनंदोत्सव साजरा करण्याची सर्व ठिकाणे खासकरून अनिवासी भागात रात्रभर सुरु ठेवावी. या निर्णयाने सर्व सुरक्षित आणि नियमित जागांवरून आपल्या राज्याच्या उत्पादनात वाढ होऊन अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व लाखो भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील. दरम्यान राज्य सरकारने नववर्षाच्या स्वागतासाठी ही परवानगी दिली असून 31 डिसेंबरच्या रात्री पब, बार आणि हॉटेल्स सुरु राहणार आहेत.
दरम्यान नववर्षाचं स्वागत होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबईत तब्बल 40 हजार पोलिसांचा पहारा असणार असून यावेळी त्यांची मुंबईकरांवर आणि खासकरुन तळीरामांवर नजर असणार आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत. यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवतील अशी माहिती डीसीपी मुंबई पोलीस पीआरओ मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे नाइट लाईफसाठी आग्रही असून त्यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा केला आहे. नाइट लाइफच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. या प्रस्तावात मुंबईतील दुकाने, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवावीत असा उल्लेख आहे. मुंबई पोलिसांनीही हा प्रस्ताव स्विकारला आहे. सध्या हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे मंजुरीसाठी असल्याचं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.