पालकांना दिलासा : ‘या’ सरकारचा मोठा निर्णय, शाळा शुल्क 30 % माफ

बेळगाव : वृत्तसंस्था – गेल्या अनेक महिन्यांपासून शुल्क भरण्यावरुन पालक व खासगी शाळांमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने महत्वाची पावले उचलली आहेत. 2020 -21 च्या शैक्षणिक वर्षात शाळा शुल्क 30 टक्‍के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व शाळांनी शिक्षण खात्याने केलेल्या सुचनांचे पालन करावे अशी सुचनाही केली आहे. त्यामुळेपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक पालक आर्थिक संकटात होते. त्यामुळे शुल्कामध्ये सवलत मिळावी या मागणीसाठी बंगळूर व इतर भागातील पालकांनी आंदोलन सुरु केले होते. पालक शुल्क भरत नसल्याने खासगी शाळांनी काही दिवस शाळा बंद ठेवून सरकारने शाळाना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. तेंव्हापासून शाळा व सरकार यांच्यात शुल्क निर्धारीत करण्यासाठी बैठकांचे आयोजन सुरु होते. त्यानंतर शुक्रवारी शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी पत्रकार परीषद घेत पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर शिक्षण खात्याने यावेळी फक्‍त 70 टक्‍के प्रवेश शुल्क घेण्याची सूचना केल्याची माहिती दिली आहे.