आजचा दिवस इतिहासात ‘काळा दिवस’ म्हणून गणला जाईल, काँग्रेस नेत्याची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत आज विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजूरी देण्यात आली. यानंतर नाराज झालेले विरोधी पक्ष राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितले. शिवाय, आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

अहमद पटेल म्हणाले, राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवे. मात्र या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहचवले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे पटेल म्हणाले.

अहमद पटेल पुढे म्हणाले की, हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. ज्या प्रकारे ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. ते लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. 12 विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतिंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत, असेही पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

कृषीमंत्री तोमर यांनी राज्यसभेत विधेयकं मांडली होती. विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, या सर्व गदारोळात आवाजी मतदान घेत विधेयकं मंजूर करण्यात आली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like