अजित पवारांनी राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाबद्दल व्यक्त केला विश्वास, म्हणाले – ‘ग्रामीण भागासाठी हा निर्णय ठरणार गेमचेंजर’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ हा कार्यक्रम राज्य सरकारचा महत्वाकांशी कार्यक्रम असून, त्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात सूक्ष्म व लघुउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार असल्याने, मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिमिर्तीसाठी चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा सभागृहात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. तेव्हा आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, अतुल बेनके, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषद विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर, ससुनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, येत्या पाच वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख सूक्ष्म व लघुउद्योग प्रस्थपित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुण, तरुणींना रोजगार प्राप्त होतील. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून, उत्पादन सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषी आधारित उद्योग, ई- वाहतूक व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांत तरुणांना व तरुणींना संधी मिळतील.

महाराष्ट्रात तरुण, तरुणींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य सरकारकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय करु इच्छित असणाऱ्या तरुण, तरुणींनी पुढे यावे. योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या गरजुंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील तरुण, तरुणींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.