उन्हाळ्यात ‘ही’ पेय ठरतील लाभदायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळ्यामध्ये तहान जास्ती लागणे स्वाभाविक असते. उन्हाळयात शरीराला शीतलता देणारे पदार्थ खावेत. तसेच थंड गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात आरोग्यसाठी लाभदायक अशी काही पेय आरोग्यसाठी महत्वपूर्ण ठरतात

कोकम सरबत
२० ग्रॅम आमसुले भिजत टाकून साधारणपणे अर्ध्या तासाने कुस्करून घेणे, गाळून घेणे. अंदाजाने ग्लासभर थंड पाणी, साधारण तीन-चार चमचे साखर, चवीपुरते मीठ व थोडे जिऱ्याचे चूर्ण घालून थंड करून पिणे.

बाजारात कोकमचे सिरपही मिळते त्यात चवीप्रमाणे पाणी, मीठ, जिऱ्याचे चूर्ण टाकूनही झटपट सरबत बनवता येते. कोकमाची (रातांबे) ताजी फळे मिळत असल्यास घरीच सिरप बनवून ठेवल्यास वर्षभर हवे तेव्हा वापरता येते.

सारिवादि हिम
अनंतमूळ, वाळा, रक्‍तचंदन, कमळ, गुलाब, मोगरा यातील मिळतील ती द्रव्ये बारीक करून घ्यावीत. या 10 ग्रॅम मिश्रणात ग्लासभर पाणी घालावे व एक वेळ व्यवस्थित ढवळून काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात रात्रभर भिजत राहू द्यावे. सकाळी हाताने कुस्करून गाळून घ्यावे, चवीपुरती साखर मिसळून प्यावे. याने पित्ताचा त्रास कमी होते, रक्‍त शुद्ध व्हायला मदत मिळते, उन्हाळी लागणे, आग होणे, डोके दुखणे वगैरे उन्हाळ्यातील त्रास टाळता येतात.

पानक
द्राक्षे, डाळिंब, फालसा वगैरे फळांचा गर काढून तो पातळ होईपर्यंत पाणी टाकावे. यातच थोडे किसलेले आले, चवीपुरती साखर, तसेच दालचिनी, तमालपत्र, वेलची, नागकेशर, मिरी व थोडासा कापून घालून एकत्र करावे. नंतर गाळून घेऊन तयार झालेल्या पेयाला “पानक” म्हणतात व ते रुचकर; तृप्ती देणारे; वात, पित्त, थकवा, तहान, चक्कर, उलटी, दाह नष्ट करणारे असून शरीर, मन ताजेतवाने करण्यास समर्थ आहे.