26/11 हल्ल्या दरम्यानच्या हिरोला ‘लॉकडाऊन’मध्ये फुटपाथवर झोपलेलं पाहून लोक झाली ‘स्तब्ध’

मुंबई : वृत्तसंस्था – 26/11 मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला क्रुरकर्मा अमजमल कासाबच्या गोळीबारातून वाचलेले आणि कसाबविरोधात साक्ष देणारे हरीश्चंद्र श्रीवर्धनकर निराधार आयुष्य रस्त्यावर जगत आहेत. साठी ओलांडलेले हे वयोवृद्ध आता कुटुंबाला नकोसे झाले आहेत. त्यामुळे त्यांना उतारवयात रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे. नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर एका दुकानदाराने त्यांना पाहिले आणि माणुसकी दाखवत आसरा दिला.

त्यांच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर ते कसाबच्या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार राहिल्याचे समजले. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांनी श्रीवर्धन रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. श्रीवर्धनकर यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले असून नाईलाजाने त्यांना रस्त्यावर आसरा घेण्याची वेळ आली आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागली होती. दहशतवादी कसाबला फाशी देण्यात ते मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. डिसुजा यांनी सांगितले की, जेव्हा ते रस्त्यावर आढळले तेव्हा त्यांनी त्यांच्या गायकवाड नावाच्या मित्राला याची माहिती दिली. गायकवाड एक एनजीओ चालवतात. एनजीओच्या सदस्यांनी जेव्हा श्रीवर्धनकर यांना जेवण दिले तेव्हा त्यांनी ते खाण्यास नकार दिला. नंतर एनजीओने त्यांना आंघोळ घातली आणि त्यांचे वाढलेले केस कापले आणि अधिक माहितीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली.

गायकवाड यांनी संपूर्ण दिवसभर फिरून महालक्ष्मी येथील मुंबई महानगरपालिका कॉलनीतील श्रीवर्धनकर यांच्या भावाला शोधून काढले. तेव्हा ते कल्याणला रहात असल्याची माहिती मिळाली. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा असलेला सहभागाबद्दल माहिती मिळाली. यानंतर गायकवाड यांनी आग्रीपाडा पोलीसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ कल्याण येथे राहणाऱ्या मुलाला प्रवासाचा पास देऊन श्रीवर्धनकर यांना कल्याणमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.

1 मे रोजी श्रीवर्धनकर यांनी कल्याणला जाण्यासाठी मुंबई सोडली. मात्र, धक्कादायक म्हणजे गायकवडा यांनी सांगितले की, श्रीवर्धनकर यांच्या कुटुंबाला त्यांना आपल्या घरी ठेवायचे नाही. ते त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासंबंधी त्यांच्याकडे विचारणा करत होते. त्यानंतर गायकवाड यांनी देशासाठी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या श्रीवर्धनकर यांना मदत करावी, असे आवहान त्यांच्या एनजीओमार्फत केले आहे, अशी माहिती एका हिंदी वृत्तपत्राने दिली आहे.