अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा हल्लाबोल; म्हणाले – ‘हे मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे प्रतिक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या १०० कोटी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआय चौकशीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आता सक्तवसुली संचालनालयने (ED) देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार मध्ये चर्चेला उधाण आलं आहे. गुन्हा दाखल केल्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे, तसंच राजकीय सूडबुद्धी ही आहे, अशी टीका केली. तर परमबीर सिंग यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने शंभर कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

CBI नंतर आता ED ने देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय सुडबुद्धीने ईडीकडून ही कारवाई केली जात आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, सचिन सावंत पुढे म्हणाले, जर पैसे दिले असे सीबीआय आणि ईडीचे म्हणणे असेल तर परमबीर आणि वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे, असा टोला देखील सचिन सावंत यांनी लगावला आहे.